अभि हम जिंदा है...! प्लेऑफच्या रेसमध्ये आरसीबीची 'मारुती उडी', पाईंट्स टेबलची स्थिती पाहिली का?

RCB Playoffs Scenario : गुजरातने दिलेल्या 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने 4 गडी गमावून 152 धावा केल्या (RCB vs GT) अन् सलग तिसरा सामना जिंकला. त्यामुळे आता प्लेऑफच्या रेसमध्ये आरसीबीने मारुती उडी घेतली आहे.

सौरभ तळेकर | Updated: May 4, 2024, 11:21 PM IST
अभि हम जिंदा है...! प्लेऑफच्या रेसमध्ये आरसीबीची 'मारुती उडी', पाईंट्स टेबलची स्थिती पाहिली का? title=
RCB Playoffs Scenario

RCB vs GT, IPL 2024 : बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानात आरसीबी आणि गुजरात यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात बंगळुरूने 4 विकेट्सने दमदार विजय मिळवला आहे. गुजरातने दिलेल्या 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने 13.4 ओव्हरमध्ये 152 धावा केल्या अन् गुजरातचं गणित गुंडाळलं. या विजयासह पाईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table) मोठी उलटफेर झाल्याचं पहायला मिळतंय. आरसीबी गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचले आहे. तर सलग तिसऱ्या पराभवानंतर गुजरातचा संघ नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याबरोबर आता प्लेऑफच्या रेसमध्ये (RCB Playoffs Scenario) आरसीबीने मारुती उडी घेतली आहे. आरसीबीसाठी आता प्लेऑफचं गणित कसं असेल? पाहुया...

कसा झाला सामना?

प्रथम फलंदाजी करताना गुजरातचा संघ 147 धावांत सर्वबाद झाला. गुजरातने केवळ 19.3 षटके खेळली. शाहरुख खान (37 धावा), डेव्हिड मिलर (30 धावा) आणि राहुल तेवतिया (35 धावा) आरसीबीच्या गोलंदाजांचा सामना करू शकले. बाकीचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. त्याला उत्तर देताना विराट कोहली आणि कॅप्टन फाफने 35 बॉलमध्ये 92 धावांची भागेदारी केली अन् सामना आपल्या पारड्यात झुकवला. फाफ डुप्लेसिसने 23 बॉलमध्ये 10 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 64 धावांची खेळी केली. तर अखेरीस दिनेश कार्तिकने 12 बॉलमध्ये 21 धावा केल्या अन् आरसीबीचा विजय पक्का केला.

प्लेऑफच्या रेसमध्ये आरसीबीची 'मारुती उडी'

आरसीबीने अखेर पाईंट्स टेबलमधील आपला तळ हलवलाय. आरसीबीने पाईटंस टेबलमध्ये आता थेट 10 व्या स्थानावरून 7 व्या स्थानी झेप घेतली आहे. आरसीबीच्या खात्यात सध्या 8 गुण आहेत. 11 सामन्यातील 4 विजयामुळे त्यांना आता आपला पाया हलवण्यात यश आलं. सलग 6 पराभवानंतर आता आरसीबीची गाडी विजयाच्या रुळावर लागलीये. 38 बॉल राखून विजय मिळवल्यामुळे आता आरसीबीच्या नेट रननेटमध्ये देखील मोठा बदल झालाय. आरसीबीचा सध्याचा नेट रननेट -0.049 झालाय. त्यामुळे आता आरसीबीने प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्याचं पहायला मिळतंय.

प्लेऑफ गाठणार तसं कसं?

मागील तीन सामन्यात जशी अफलातून कामगिरी आरसीबी करतीये, तशीच कामगिरी त्यांना आगामी तीन सामन्यात करावी लागणार आहे. त्यांना अजून तीन सामने खेळायचे आहेत. बंगळुरूचे आगामी सामने पंजाब, दिल्ली आणि चेन्नईविरुद्ध आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येक सामना हा करो या मरो असाच असेल. फक्त तीन सामने जिंकून आरसीबीला प्लेऑफ गाठता येणार नाही. आरसीबीला प्लेऑफमध्ये जायचं असेल तर लखनऊ किंवा हैदराबादला उर्वरित सामने हरावे लागतील. तसेच चेन्नई आणि दिल्ली 4 पैकी 3 सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागणार आहे. 

गुजरात टायटन्स लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), ऋद्धीमान साहा, साई सुधारसन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, मानव सुथार, नूर अहमद, मोहित शर्मा आणि जोशुआ लिटल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज, यश दयाल आणि विजयकुमार वैशाक.