नाशिक हादरलं! Money Heist प्रमाणे 15 मिनिटांत लंपास केलं 50000000 रुपयांचं सोनं

Nashik Crime 5 Crore Gold Went Missing: एक ग्राहक आपले दागिने ठेवण्यासाठी आलेला असताना त्याने बॅक मॅनेजरसमोर लॉकर उघडलं असता आधीचे दागिने गायब असल्याचं लक्षात आलं. अशापद्धतीने केवळ एकाच नाही तर 222 लॉकरवर डल्ला मारण्यात आला.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 6, 2024, 05:07 PM IST
नाशिक हादरलं! Money Heist प्रमाणे 15 मिनिटांत लंपास केलं 50000000 रुपयांचं सोनं title=
नाशिकमध्ये या प्रकरणामुळे एकच खळबळ (प्रातिनिधिक फोटो)

Nashik Crime 5 Crore Gold Went Missing: नाशिकमधून एका खासगी होम फायनान्स कंपनीमधून 222 ग्राहकांचे दागिने गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुना गंगापुर नाका येथील कंपनीच्या शाखेत हा सारा प्रकार घडला आहे. सेफ्टी लॉकर्सच्या किल्लीच्या मदतीने अगदी हुशारीने अज्ञात व्यक्तींनी 4 कोटी 92 लाख रुपये मुल्याच्या दागिद्यांवर डल्ला मारला आहे. या दागिन्यांमध्ये दीड किलो सोनं होत अशी माहिती समोर आली आहे. कंपनीमधील सीसीटीव्ही कॅमेरात चोरीची संपूर्ण घटना कैद झाली आहे. विशेष म्हणजे चित्रपटांमध्ये दाखवतात त्याप्रमाणे ही चोरी करण्यात आली आहे. 

कसा समोर आला हा प्रकार?

शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या जुना गंगापूर नाका येथील प्रमोद महाजन उद्यानाच्या बाजूला असलेल्या इंदिरा हाइट्स कॉर्परेट संकुलामध्ये या कंपनीचं कार्यालय अगदी वरच्या मजल्यावर आहे. या कंपनीतील सेफ्टी लॉकरमधील जवळपास 222 ग्राहकांचे दागिने ठेवले होते. शनिवारी म्हणजेच 4 मे रोजी या ठिकाणी चोरी झाल्याचं पहिल्यांदा समोर आलं. एक ग्राहक सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी लॉकर सेवा वापरण्याच्या उद्देशाने या कंपनीत आला होता. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास आलेल्या या ग्राहकाकडे असलेली त्याच्या लॉकरची किल्ली आणि क्रेडिट मॅनेजर यांच्याकडील किल्ली वापरुन या ग्राहकाचा लॉकर उघडण्यात आला. मात्र या लॉकरमध्ये पूर्वी ठेवलेले सोन्याचे दागिने नव्हते असं लक्षात आलं आणि मॅनेजरसहीत ग्राहकाला धक्काच बसला. यासंदर्भातील माहिती वरिष्ठांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. 

पोलिसांनी काय माहिती दिली?

पोलीस अधिकाऱ्यांनी 'झी 24 तास'शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, "गुन्हेगारांनी खिडकीतून प्रवेश केला. त्यांना चावी उपलब्ध झाल्याचं स्पष्ट होत आहे. आम्ही सर्व दिशेने तपास करत आहोत. यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे. त्यांना माहिती कशी मिळाली? त्यांनी आधी रेकी केली होती का? या साऱ्याचा तपास सध्या सीसीटीव्ही आणि बातमीदारांच्या माध्यमातून केला जात आहे."

15 मिनिटांमध्ये घडला सारा प्रकार

15 मिनिटांमध्ये हा सारा प्रकार घडल्यासंदर्भात प्रश्न विचारला असता पोलिसांनी, "प्रत्यक्षात ते बँकेत असल्याचा कालावधी कमी आहे. त्यांनी कधी बँकेत प्रवेश केला वगैरे याचा तपास सध्या करत आहेत," असं म्हटलं आहे. यामध्ये बँकेचा निष्काळजीपणाचा भूर्दंड ग्राहकांना बसला आहे. बँकेने लॉकरच्या चाव्याही लॉकरच्या आजूबाजूलाच ठेवल्याने त्या चोरांना सहज वापरता आल्याची माहिती समोर येत आहे. हे लॉकर चावीने उघडून ही चोरी करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये सध्या तरी 222 ग्राहकांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचं समोर आलं असलं तरी ग्राहकांची आणि लंपास केलेल्या दागिण्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हा सारा प्रकार समोर आल्यानंतर ही चोरी अगदी नियोजनपूर्वकपणे केल्याचं उघड होत असून नाशिकमधील हे 'मनी हाइस्ट' या वेबसिरीजप्रमाणे चोरी केल्याचा सारखा प्रकार सध्या चांगलाच चर्चेत असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ICICI Home Finance कंपनीने यासंबंधी स्टेटमेंट जारी केलं आहे. आयसीसीआय एचएफसीने चोरीच्या सखोल चौकशीसाठी पोलीस तक्रार दाखल केली आहे. आयसीसीआय एचएफसी सध्या सुरू असलेल्या तपासात अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहे आणि ग्राहकांचे आर्थिक नुकसान होणार नाही याची खात्री करेल असं त्यांनी सांगितलं आहे.