मोदी भटकती आत्मा कोणाला म्हणाले? अजित पवार म्हणतात, 'मी त्यांना विचारेन, तुम्ही हे..'

Lok Sabha Election 2024 PM Modi Pune Rally: पंतप्रधान मोदींनी सोमवारी पुण्यात अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासहीत महायुतीच्या अन्य 4 उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यामध्ये त्यांनी हे विधान केलेलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 30, 2024, 03:46 PM IST
मोदी भटकती आत्मा कोणाला म्हणाले? अजित पवार म्हणतात, 'मी त्यांना विचारेन, तुम्ही हे..' title=
अजित पवारांनी नोंदवली प्रतिक्रिया

Lok Sabha Election 2024 PM Modi Pune Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी पुण्यामध्ये आयोजित सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांवर निशाणा साधताना त्यांचा 'भटकती आत्मा' असा उल्लेख केला. शरद पवारांमुळे महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली असं म्हणताना मोदींनी शरद पवारांचा थेट उल्लेख टळत त्यांना 'भटकती आत्मा' असं म्हटलं. यावेळेस मोदींनी दिलेले पक्ष स्थापनेचे, कौटुंबिक राजकीय कलहाचे आणि 2019 मधील महाविकास आघाडीच्या स्थापनेचा संदर्भ देत त्यांचा इशारा पवारांच्या दिशेने असल्याचं मात्र आवर्जून अधोरेखित केलं. आता याच टीकेवर शरद पवार यांचे पुतणे आणि त्यांच्या विरोधात राजकीय भूमिका घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान मोदींनी पुण्यात महायुतीच्या 4 उमेदवारांसाठी सोमवारी सायंकाळी प्रचारसभा घेतली. या सभेतील भाषणामध्ये मोदींनी शरद पवारांवर निशाणा साधला. "महाराष्ट्राने दिर्घकाळ राजकीय अस्थिरतेचा काळ पाहिला आहे. मी जे बोलतोय ते कोणी व्यक्तिगत घेऊ नका. आमच्याकडे म्हणतात काही भटकत्या आत्मा असतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, ज्यांची स्वप्नं पूर्ण होत नाहीत त्या आत्मा भटकत राहतात. स्वत:चं नाही झालं तर इतरांचं बिघडवण्यात त्यांना मजा येते. आपला महाराष्ट्रही अशा भटकत्या आत्म्यांना बळी पडला आहे. 45 वर्षांआधी येथील एका मोठ्या नेत्याने आपल्या महत्त्वकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली," असं म्हणत मोदींनी थेट उल्लेख न करता शरद पवारांना टोला लगावला. "तेव्हापासून (मागील 45 वर्षांपासून) महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरु आहे. अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळ पूर्ण करु शकले नाहीत. ही आत्मा काहीही करते. विरोधकांनाही तिने अस्थिर केलं आहे. ही आत्मा आपल्या पक्षाला आणि कुटुंबालाही अस्थिर केलं आहे. 1995 महायुती सरकारवेळीही या आत्माने सरकारला अस्थिरत करण्याचा प्रयत्न केला," असंही मोदींनी यावेळी म्हटलं.

नक्की वाचा >> 'आता 4 जूननंतर भाजप आणि..'; शरद पवारांना 'भटकती आत्मा' म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांचं उत्तर

माहाविकास आघाडीचाही संदर्भ

विधानसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवारांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीची स्थापना झाल्याचा संदर्भ देतही मोदींनी टीका केली. "2019 मध्ये जनादेश धुडकावत जनादेशाचा एवढा अपमान केला ते महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊक आहे. आज महाराष्ट्रातील भटकत्या आत्म्याचं समधान होत नाही तर देशभरात अस्थिरता निर्माण करण्याचा खेळ चालवला आहे. आज भारताला अशा भटकत्या आत्म्यांपासून वाचवण्यासाठी देशाला स्थिर आणि मजबूत सरकारच्या दिशेने वाटचाल करणं गरजेचं आहे," असं मोदी म्हणाले.

नक्की वाचा >> 'निर्लज्ज', 'डोके फिरलं', 'स्वकर्तृत्व शून्य' म्हणत ठाकरेंचा अजित पवारांवर घणाघात; म्हणाले, '4 जूननंतर..'

अजित पवार यावर काय म्हणाले?

अजित पवार यांना मोदींनी केलेल्या या टीकेसंदर्भात विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना, "मी ज्योतिषी नाही. त्यासंदर्भात त्यांच्या मनामध्ये काय आहे ठाऊक नाही. मी मगाशीच उत्तर दिलं, याबाबतीमध्ये पुढची कुठली सभा असेल तेव्हा मी पण तिथे असेल त्यावेळी मी पंतप्रधानांना विचारेन, 'त्या भटकत्या आत्म्याचं नक्की नाव काय आहे? किंवा कुठला उद्देश डोळ्यासमोर ठेऊन तुम्ही हे स्टेटमेंट केलं असं विचारीन. त्यांनी सांगितल्यावर तुम्हाला सांगेन त्यांचं कसं म्हणणं होतं,' असं अजित पवारांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.