भारतात लवकरच आपोआप दुरुस्त होणारे रस्ते? NHAI ने सुरु केलं काम; खड्ड्यांची समस्या कायमची संपणार

Self Healing National Highways In India: रस्त्यांवरील खड्ड्यांच्या डागडुजीसाठी दर वर्षी देशभरामध्ये हजारो कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो. तसेच या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागतात. त्यामुळेच आता यावर उपाय म्हणून नवीन तंत्रज्ञानाचा विचार केला जात आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 6, 2024, 07:41 AM IST
भारतात लवकरच आपोआप दुरुस्त होणारे रस्ते? NHAI ने सुरु केलं काम; खड्ड्यांची समस्या कायमची संपणार title=
या तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भातील हलचाली सुरु

Self Healing National Highways In India: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वाखालील रस्ते वाहतूक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सध्या एका अनोख्या तंत्रज्ञानासंदर्भात चापपणी सुरु आहे. हे तंत्रज्ञान यशस्वीपणे वापरता आलं तर रस्त्यांच्या देखभाल करण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून जाईल. या तंत्रज्ञानामध्ये रस्ते स्वत:हून म्हणजेच आपोआप दुरुस्त होतील. यासाठी सेल्फ हिलिंग म्हणजेच आपोआप खड्ड्यांमध्ये भरलं जाणाऱ्या खास पद्धतीच्या सिमेंटचा वापर केला जाईल. यामुळे रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांचा मुद्दा कायमचा निकाली निघण्यास मदत होईल. भारतात सध्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात आणि यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागतात.

कायम स्वरुपी उपाय

"आम्ही सध्या भारतात तयार केलेली आणि अपारंपारिक पद्धत वापरुन रस्ते दिर्घकाळ टीकेवत अशा दृष्टीने प्रयत्न करत आहोत. या माध्यमातून आम्ही रस्त्यावरील खड्ड्यावर कायम स्वरुपी उपाय शोधण्याच्या प्रयत्नात आहोत," असं एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर 'इकनॉमिक टाइम्स'ला सांगितल्याचं वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे. 

चाचपणी सुरु

मात्र हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात वापरण्याआधी याचा खर्च किती येतो, हे मोठ्या प्रमाणात वापरता येईल का? याचा अपेक्षित परिणाम होईल का? ते परिणामकारक असेल का? या साऱ्या गोष्टींची चाचपणी केली जात आहे. सेल्फ हेलिंग सिमेंटच्या गुणधर्मांचा वापर करुन रस्त्यांवर वारंवार पडणाऱ्या खड्ड्यांची समस्या निकाली काढता येणार आहे. "यामुळे रस्त्यांचं आयुष्य वाढेल. खास करुन रस्त्यांच्या देखभालीचं काम पूर्णपणे बंद होईल. तसेच यामुळे वाहतुकीची समस्याही निकाली निघेल," असंही या अधिकाऱ्याने सांगितलं.

खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताचं प्रमाण मोठं

राष्ट्रीय महामार्गांवरील खड्ड्यांमुळे भारतात होणाऱ्या अपघातांचं प्रमाण 22.6 टक्क्यांनी वाढलं आहे. 2021 मध्ये 3635 रस्ते अपघात खड्ड्यांमुळे झालेले. आता हा आकडा 4446 वर पोहोचला आहे. या अपघांमध्ये एकूण 1856 जणांचा मृत्यू झाला आहे. 

कसं काम करणार हे तंत्रज्ञान?

या विशेष सिमेंटला एकसंध पकडून ठेवणाऱ्या घटकामध्ये स्टीलचे तुकडे मिसळले जातात. त्यामुळे हे सिमेंट गरम होऊन पसरते. या खास प्रकारच्या सिमेंटला त्यामध्ये मिसळलेल्या धातुच्या तुकड्यांच्या माध्यमातून उष्णता दिल्यास ते दगड आणि मातीला घट्ट पकडून ठेवते. हे सिमेंट वापरुन रस्त्यावरील भेगा भरल्या जातात आणि रस्त्यांची दुरुस्ती होते.

2600 कोटींचा निधी

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये 2,600 कोटींचा निधी रस्त्यांच्या देखभालीसाठी दिला आहे. मागील वर्षी हाच निधी 2573 कोटी इतका होता.