LokSabha: शरद पवारांनी भरसभेत ऐकवलं नरेंद्र मोदींचं भाषण, म्हणाले 'हा पहिला पंतप्रधान....'

LokSabha Election: मी अनेक पंतप्रधान पाहिले असून, त्या सर्वांनी देशाचा विचार केला. पण हा पहिला पंतप्रधान आहे, जो देशाचा विचार करत नाही अशी टीका शरद पवार (Sharad Pawar) यांनी नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) केली आहे. माढा मतदारंसघातील प्रचारसभेत त्यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.    

शिवराज यादव | Updated: Apr 24, 2024, 01:11 PM IST
LokSabha: शरद पवारांनी भरसभेत ऐकवलं नरेंद्र मोदींचं भाषण, म्हणाले 'हा पहिला पंतप्रधान....' title=

LokSabha Election: मी अनेक पंतप्रधान पाहिले असून, त्या सर्वांनी देशाचा विचार केला. पण हा पहिला पंतप्रधान आहे, जो देशाचा विचार करत नाही अशी टीका शरद पवार (Sharad Pawar) यांनी नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) केली आहे. सोलापूरच्या माढा मतदारंसघातील प्रचारसभेत त्यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान या सभेत शरद पवारांनी आपल्या मोबाईलवरुन नरेंद्र मोदींचं 2014 मधील भाषण ऐकवलं. आपण दिलेलं आश्वासन पूर्ण करत नाही, आणि आम्हाला शिव्या देतात अशी टीका त्यांनी केली. 

नरेंद्र मोदींनी महागाई तसंच दिलेली इतर आश्वासनं पाळली नाहीत असं सांगताना शरद पवारांनी त्यांनी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी केलेलं भाषण ऐकवलं. या भाषणात नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग यांच्यावर टीका करताना ते महागाईवर भाष्य करण्यास तयार नसल्याची टीका केली होती. त्यांना गरिबांची पर्वा नाही असंही ते म्हणाले होते. याचा संदर्भ देत शरद पवार म्हणाले की, "नरेंद्र मोदींनी दिलेला शब्द पाळलेला नसून, गरिबांची महागाईतून सुटका केलेली नाही. आणि आम्हाला शिव्या देत आहेत. तुम्ही 10 वर्षात काय केलं? 10 वर्षांपासून तुमची सत्ता असताना आम्हाला हिशोब विचारत आहेत".

सामान्य माणसाच्या अडचणी कशा सोडवायच्या ही संधी या निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे असं शरद पवार म्हणाले आहेत. "देशात भाजपाची सत्ता असून नरेंद्र मोदी नेतृत्व करतात. त्यांच्या हातात कारभार आहे. त्यांनी अनेक आश्वासनं दिली की, महागाई कमी करणार. शपथ घेतल्यानंतर 50 दिवसाच्या सुरुवात करु असं ते म्हणाले होते," याची आठवण शरद पवारांनी करुन दिली. 

"आपण शेती करणारे लोक आहोत. एकेकाळी वाहनं कमी होती, पण आता संख्या वाढली आहे. त्यामुळे पेट्रोल महत्त्वाची गरज आहे. पेट्रोल दर 50 दिवसात कमी आणतो म्हणाले होते. पण आज आश्वासन देऊन 3650 दिवस झाले. दर 106 रुपये आहे. संपूर्ण अर्थव्यवस्था संकटात नेली. गॅस सिलेंडर 410 वरून 1160 वर नेला. मग यांच्याव कसा विश्वास ठेवायचा?," अशी विचारणा शरद पवारांनी केली. 

"तरूण मुलांना ताकत द्या. त्यांना काम दया. बेरोजगारी घालवण्याचं आश्वासन दिलं, त्याचं काय झालं. मोदींनी दिलेले शब्द पाळले नाहीत आणि तेच आता शिव्या देतात. तुम्ही 10 वर्षात काय केलं ते सांगा, नोटाबंदी? 700 लोकांना रांगेत उभं राहून जीव गमवावा लागला. इंग्रजांच्या  काळात होत तसं आज जाणवत आहे. सगळं कामकाज हुकूमशाहीच्या दिशेने सुरु आहे. नेहरु, राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्यावर नेहमी टीका करत असतात. मी अनेक पंतप्रधान पाहिले. सर्वांनी देशाचा विचार केला. हा पहिला पंतप्रधान आहे जो देशाचा विचार करत नाही. लोकांमध्ये संघर्ष कसा वाढेल यासाठी प्रयत्न करत असतात. हा देश हिंदूंचा आहे तसा मुस्लिमांचा, ख्रिश्चनांचा, शिखांचा आहे. या सर्वांना एकत्र ठेवण्याचं काम पंतप्रधानांचं आहे," असंही शरद पवारांनी सांगितलं.