पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी घटना; जादूटोण्याच्या संशयावरुन दोघांना जिवंत जाळले

गडचिरोली येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. जादूटोण्याच्या संशयावरुन दोघांना जिवंत जाळण्यात आले आहे. 

Updated: May 3, 2024, 09:16 PM IST
पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी घटना; जादूटोण्याच्या संशयावरुन दोघांना जिवंत जाळले title=

Gadchiroli Crime News : पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी सर्वात मोठी घटना घडली आहे. गडचिरोलीमध्ये जादूटोण्याच्या संशयावरुन दोघांना जिवंत जाळण्यात आले आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. विशेष म्हणजे या कृत्यात महिलेच्या पतीसब तिच्या मुलाचा देखील समावेश होता. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. 

जमानी तेलामी ही महिला आणि देऊ अटलामी या पुरुषाला जिवंत जाळण्यात आलंय. याप्रकरणी 15 जणांना अटक करण्यात आली. 1 मे रोजी म्हणजे महाराष्ट्र दिनी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी दोघांना मारहाण केली. यानंतर मरणासन्न अवस्थेतल्या या दोघांना गावाबाहेरच्या नाल्यात नेलं. दोघांवर पेट्रोल टाकून त्यांना जीवंत जाळण्यात आले.

नेमकी काय आहे घटना?

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  या गावात काही ग्रामस्थांनी जादूटोण्याच्या संशयावरून एका महिलेसह दोघांना जिवंत जाळले.  जमानी तेलामी ( वय 52 वर्षे) आणि देउ अटलामी (वय 60 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.  याप्रकरणी 15 जणांना अटक करण्यात आली आहे.  

बारसेवाडा येथील लोकांना जमनी आणि देउ जादूटोणा करत असल्याचा संशय होता.  1 मे रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ग्रामस्थांनी  दोघांनाही बेदम मारहाण केली.  यानंतर रात्री 10 वाजेच्या सुमारास मरणासन्न झालेल्या दोघांना गावाबाहेरील नाल्यात नेत त्यांच्यावर पेट्रोल टाकून जाळण्यात आले.  दरम्यान, पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. तपासात घटनास्थळी दोघांचेही मृतदेह जळालेले आढळले.  या प्रकरणी गावातून एकूण 15 जणांना अटक करण्यात आली असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.  आरोपींमध्ये मृत जमानी यांचे पती देवाजी तेलामी (60) आणि मुलगा दिवाकर तेलामी (28) यांचाही समावेश आहे.

दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याला अटक

फेब्रुवारी ते मे या काळात नक्षली टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या दरम्यान गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका कट्टर नक्षलवाद्याला अटक केली आहे. जहाल नक्षली शंकर वंगा कुडयाम, वय-34 वर्षे, रा. कांडलापारती, पो. तह. भोपालपट्टनम, जि. बिजापुर (छ.ग.) याला सिरोंचा पोस्ट पार्टी व विशेष अभियान पथकाने  सिरोंचा ते कालेश्वरम (तेलगंणा) जाणा­या रोडवर लावलेल्या नाकाबंदी दरम्यान अटक केली. तो कट्टर नक्षल समर्थक असल्याचे निष्पन्न झाले. या आधीसुद्धा नक्षली कारवायांमध्ये मदत तसेच राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन पोलीसांविरुध्द कट रचणे, सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे, स्फोटके पेरणे अशी कामे तो करीत होता. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 79 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.